अहमदाबादमध्ये चक्क ICU त रंगला गरबा
By Admin | Updated: October 20, 2015 18:46 IST2015-10-20T18:40:39+5:302015-10-20T18:46:03+5:30
अहमदाबादमधील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) रंगलेला गरबा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

अहमदाबादमध्ये चक्क ICU त रंगला गरबा
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २० - नवरात्रीत शहराच्या मैदान, सोसायटी ते अगदी गल्लीबोळ्यातील रस्त्यापर्यंत सध्या सर्वत्र गरब्याची धूम असली तरी अहमदाबादमधील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) रंगलेला गरबा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आयसीयूत डॉक्टर, नर्सेस व रुग्णालयातील कर्मचा-यांनी केलेल्या गरब्यावर आता टीका सुरु झाली आहे.
अहमदाबादमध्ये सोना रुग्णालय असून या रुग्णालयात नुकतेच डायलिसीस सेंटर सुरु करण्यात आले असून गुजरातचे आऱोग्यमंत्री नितीनभाई पटेल यांच्या हस्ते सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडला. आरोग्य मंत्री परतल्यावर रुग्णालयातील कर्मचा-यांनी चक्क अतिदक्षता गरबा खेळायला सुरुवात केली. हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आरोग्यमंत्री पटेल यांनी याप्रकरणात रुग्णालयाकडून अहवाल मागवला असून रुग्णालय प्रशासनानेही याप्रकारावर दिलगिरी व्यक्त केली आहे. हा प्रकार घडायला नको होता असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक एच के भावसार यांनी सांगितले. या गरब्यात सहभागी झालेल्यांना नोटीस बजावू असेही त्यांनी स्पष्ट केले.