बिअरच्या कॅनवर गांधीजींचे छायाचित्र, अमेरिकेतील कंपनीचा प्रताप
By Admin | Updated: January 4, 2015 13:04 IST2015-01-04T13:04:37+5:302015-01-04T13:04:59+5:30
जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचे छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीने त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आले आहे.

बिअरच्या कॅनवर गांधीजींचे छायाचित्र, अमेरिकेतील कंपनीचा प्रताप
ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद,दि. ४ - जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचे छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीने त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आले आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैद्राबादमधील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून यानंतर कंपनीने माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिका स्थित न्यू इंग्लंड ब्रूईंग कंपनी या कंपनीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नावे अमेरिकेतील बाजारपेठेमध्ये 'गांधी बोट' ही बिअर आणली आहे. गांधींजींप्रमाणे ही बिअरही शाकाहारी असून आत्म शुद्धिकरण आणि सत्याच्या शोधात असलेल्यांसाठी ही बिअर उपयुक्त आहे अशी जाहिरातबाजीही या कंपनीने सुरु केली होती. हा प्रकार समजताच त्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले. हैद्राबादमधील एका वकिलाने न्यायालयामध्ये कंपनीविरोधात याचिका दाखल केली होती. महात्मा गांधीजींचे छायाचित्रांचा अशा कामासाठी वापर करणे दंडनीय अपराध असून यामुळे राष्ट्रभावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्ते वकिल जनार्दन रेड्डी यांनी केला होता. याप्रकरणी उद्या सुनावणीही होणार आहे. भारतात तीव्र पडसाद उमटताच कंपनीला जाग आली असून कंपनीने या कृत्यांसाठी भारतीयांची माफीही मागितली आहे.