भारतीय चलनी नोटांवर गांधीजीच राहणार!
By Admin | Updated: December 6, 2014 02:56 IST2014-12-06T02:56:39+5:302014-12-06T02:56:39+5:30
भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याशिवाय अन्य कुणा राष्ट्रीय पुरुषाचे चित्र छापण्यास रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने नकार दिला आहे.

भारतीय चलनी नोटांवर गांधीजीच राहणार!
नवी दिल्ली : भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याशिवाय अन्य कुणा राष्ट्रीय पुरुषाचे चित्र छापण्यास रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने नकार दिला आहे. राष्ट्रपित्याशिवाय अन्य कोणत्याही महापुरुषाचे व्यक्तिमत्त्व भारतीय मूल्य परंपरांचे इतके चपखल प्रतिनिधित्व करू शकत नाही, असा निर्वाळा या समितीने दिला आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. जेटली यांनी सांगितले की, चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याशिवाय इतरही राष्ट्रपुरुषांची चित्रे छापण्यात यावीत, अशी मागणी केंद्र सरकारकडे विविध पातळ््यांवरून होत होती.
या मुद्द्यावर साकल्याने विचारमंथन करण्याचा सल्ला केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला दिला होता. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने आॅक्टोबर २०१० मध्ये एक समिती गठीत केली होती. भविष्यात चलनी नोटांचे डिझाइन कसे असावे, यावर समितीने विचार केला. महात्मा गांधी यांच्याशिवाय इतर महापुरुषांची चित्रे नोटांवर छापता येऊ शकतात का, यावर समितीने सखोल चर्चा केली. चर्चेअंती समितीने सध्याचे डिझाइन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.