अपंगांचा गांधीगिरीचा प्रहार

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:35+5:302015-02-18T00:13:35+5:30

Gandhigiri strikes of disabled people | अपंगांचा गांधीगिरीचा प्रहार

अपंगांचा गांधीगिरीचा प्रहार

>
पुणे : अपंग धोरणाची अंमलबजावणी, नोकर भरती, घरकुल योजना व गाळेवाटपात ३ टक्के आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे. शिवजयंतीला (दि. २०) आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिराद्वारे अपंगांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. राज्यभरातील अपंग व्यक्ती या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
अपंगांच्या पेन्शन रक्कमेत वाढ करावी, उच्च व तंत्र शिक्षणच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना गारपीटग्रस्तांप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, या साठी हे आंदोलन उभारण्यात आले आहे. मुंबईत २० फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता सीएसटी (छत्रपती शिवाजी टर्मिनल) रेल्वे स्टेशन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, राष्ट्रसंत गाडगेबाबा धर्मशाळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. रक्तदान शिबिर देखील यावेळी आयोजित करण्यात आले आहे. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव व रफिक खान यांनी ही माहिती दिली.
या नंतरही मागण्यांकडे गांभीर्याने न पाहिल्यास पुढील टप्प्यात मंत्र्यांच्या बंगल्यात स्वच्छता मोहिम राबवून आंदोलन केले जाईल. या आंदोलनास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, विजय जावंधिया, चंद्रकांत वानखेडे, सत्यपाल महाराज उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.

Web Title: Gandhigiri strikes of disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.