निधी बँकेत जमा करा; राजकीय पक्षांना बडगा
By Admin | Updated: August 30, 2014 02:42 IST2014-08-30T02:42:28+5:302014-08-30T02:42:28+5:30
राजकीय पक्षांना आपला निधी बँकांमध्ये जमा करणे अप्रत्यक्षरीत्या बंधनकारक करणारा आदेश निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी केला

निधी बँकेत जमा करा; राजकीय पक्षांना बडगा
नवी दिल्ली : राजकीय पक्षांना आपला निधी बँकांमध्ये जमा करणे अप्रत्यक्षरीत्या बंधनकारक करणारा आदेश निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी केला. उमेदवारांना पक्षाकडून अर्थसाहाय्य देताना खर्चाची कमाल मर्यादा ओलांडली जाऊ नये. तसेच निधीबाबत पारदर्शकता, उत्तरदायित्व बाळगले जावे, असे आयोगाने म्हटले.
निवडणूक खर्चासाठी पक्षनिधीचा वापरताना पारदर्शकता, जपण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी करण्याचा एक भाग म्हणून आयोगाने कलम ३२४ अन्वये आदेश दिला आहे. निवडणुकीवर देखरेख, मार्गदर्शन तसेच नियंत्रणाबाबत हे कलम आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार राजकीय पक्षांच्या कोषाध्यक्षांना प्रदेश आणि निम्न स्तरावरील सर्व खात्यांसह केंद्रीय मुख्यालयाच्या संयुक्त खात्याचा लेखाजोखा ठेवणे क्रमप्राप्त राहील. चार्टर्ड अकाउंटन्टस् संस्थेने खात्यांच्या हिशेबाबत दिलेल्या मार्गदर्शक संहितेनुसार हा लेखाजोखा असावा. कोणतीही व्यक्ती किंवा कंपनीला २० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम देऊ नये. बँक नसलेला ग्रामीण भाग मात्र त्याला अपवाद असेल. पक्षाचे पदाधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना वेतन, निवृत्तीवेतन किंवा मेहनताना देताना रोख रक्कम द्यावी लागत असेल तर ती बाबही ग्राह्य धरण्यात आली आहे.