तेलंगाणाची राजधानी हैदराबाममध्ये आईने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यापासून चिमुकलीचे प्राण वाचल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार राजेंद्रनगर येथील गोल्डन हाइट्स कॉलनीमध्ये घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
राजेंद्रनगर येथील गोल्डन हाइट्स कॉलनीमध्ये मंगळवारी एका चार वर्षांच्या मुलीवर दोन भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. तसेच तिला फरफटत घेऊन जाऊ लागले. मात्र या मुलीच्या आईने बिकट परिस्थितीत प्रसंगावधान दाखवले आणि या कुत्र्यांना पळवून लावत त्यांच्या तावडीतून मुलीची सुटका केली.
या घटनेबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलगी घराजवळ खेळत होती. तेवढ्यात दोन भटके कुत्रे तिच्या दिशेने आले. त्यावेळी मुलीने या कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांनी या मुलीचा चावा घेत तिला ओढत नेण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेली मुलगी मोठमोठ्याने रडू लागली. दरम्यान, हा प्रकार पाहताच तिच्या आईने धाव घेतली आणि कुत्र्यांना पळवून लावत मुलीचे प्राण वाचवले.
दरम्यान, या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मुलीचे पाय, कंबर आणि जांघेवर जखमा झाल्या आहेत. नातेवाईकांनी या जखमी मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. सध्या या मुलीवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत नाराजी व्यक्त केली आहे.