निवडणुकीसाठी चार हजारांचे मनुष्यबळ
By Admin | Updated: February 15, 2017 20:45 IST2017-02-15T20:45:05+5:302017-02-15T20:45:05+5:30
निवडणुकीसाठी ४ हजारांहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा लागणार आहे.

निवडणुकीसाठी चार हजारांचे मनुष्यबळ
अमरावती : येत्या महापालिका निवडणुकीसाठी तब्बल ४ हजारांहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा लागणार आहे. भाजपच्या रीता पडोळे या अविरोध निवडून आल्याने ८६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ६२८ उमेदवार उतरले आहेत. प्रत्यक्ष मतदानासाठी पालिका यंत्रणेने पूर्वतयारीला गती दिली आहे.
महापालिका क्षेत्रातील २२ प्रभागांसाठी ७३८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या मतदान केंद्रांवर प्रत्येकी १ केंद्राध्यक्ष आणि प्रत्येकी ३ असे एकूण २९४० कर्मचारी राहणार आहेत. याशिवाय मतदान केद्रांवर उपलब्धतेप्रमाणे शिपाई पुरविण्यात येईल. १० टक्के मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय निवडणूक काळातील विविध पथके आणि तांत्रिक मनुष्यबळ पाहता हा आकडा ४ हजारांवर पोहोचला आहे. सातही झोनमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी असा भला मोठा लवाजमा निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी राबत आहेत.
मानधन थेट बँक खात्यात
४निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आदींसह अन्य जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवडणूक मानधन यंदा त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. कॅशलेस व्यवहाराकडे एक पाऊल म्हणून हा व्यवहार आरटीजीएसद्वारे करण्यात येणार आहे.या मानधनासाठी संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅक खातेपुस्तिकेचे सत्यप्रत आणि आयएफएससी कोड संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावा,असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.