लडाखला सहाव्या अनुसूचीत समाविष्ट करण्यासाठी आणि राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आणि ३० पोलिस आणि सीआरपीएफ जवानांसह ७० जण जखमी झाले.
दरम्यान, आता भाजपाने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. 'लडाखमधील हिंसाचार हा काँग्रेस पक्षाच्या धोकादायक कटाचा भाग होता, याचा उद्देश देशात बांगलादेश, नेपाळ आणि फिलीपिन्ससारखी परिस्थिती निर्माण करणे हा आहे. आज, लडाखमधील निदर्शने Gen-Z यांनी रचली आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तपासात हा Gen- Z यांचा निषेध नव्हता तर काँग्रेस पक्षाचा निषेध होता, असे दिसून आल्याचा दावा केला आहे.
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
काँग्रेसचे वाईट हेतू आहेत - भाजप
माध्यमांसोबत संवाद साधताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, "काँग्रेसचे वाईट हेतू आहेत. हे काँग्रेसचे षड्यंत्र आहे. 'भारत तेरे तुकडे होंगे, इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाह' हे काँग्रेसचे मुख्य नारा आहे. हे राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस यांचे षडयंत्र आहे. त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत नसल्याने ते देश तोडण्याचा कट रचत आहेत.
राहुल गांधी बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करतात
पात्रा म्हणाले, "राहुल गांधी वारंवार तरुणांना बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी चिथावणी देतात. हे आजकाल फिलीपिन्समध्ये घडत आहे. ते भारतातही अशीच परिस्थिती निर्माण करू इच्छितात. काँग्रेससाठी हे योग्य नेतृत्व आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
"काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी हे लक्षात ठेवावे की असे प्रयत्न भारतात यशस्वी होणार नाहीत. भारत ही हजारो वर्षे जुनी संस्कृती आहे. या देशातील लोकांमध्ये चांगले आणि वाईट यात फरक करण्याची क्षमता आहे. त्यांना माहिती आहे की पंतप्रधान आणि सरकार त्यांच्यासाठी काय करत आहेत",असेही पात्रा म्हणाले.
"२०१४ पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज काय आहे. आज आपण जगात एका चमकत्या ताऱ्यासारखे आहोत. या देशातील लोकांना सर्वकाही माहित आहे. जर तुम्ही देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला तर जनता उत्तर देईल, असा टोला पात्रा यांनी लगावला.