रांची - झारखंडचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते चंपई सोरेन यांना रविवारी घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या आरोग्य संस्थेसाठी करण्यात आलेल्या भूसंपदनाविरुद्ध आदिवासी संघटनांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांचा मुलगा बाबूलाल सोरेन व रांचीला जाणाऱ्या इतर समर्थकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंपई सोरेन यांनी सरकारचे हे पाऊल लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. आदिवासींना आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळेच आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
नेमके प्रकरण काय? १,०७४ कोटी रुपयांच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (रिम्स) विस्तारित प्रकल्पासाठी आरोग्य विभागाने २०७ एकर जमीन दिली आहे. झारखंडचे आरोग्यमंत्री इरफान अन्सारी यांनी मागील महिन्यात दावा केला होता की, रिम्स-२ मध्ये २,६०० खाटांचे रुग्णालय, वैद्यकीय पदवीच्या १०० व पदव्युत्तरच्या ५० जागा असतील.याच्या निषेधार्थ २० पेक्षा अधिक आदिवासी गट, शेतकरी व जमीन मालकांनी रविवारी संबंधित जमिनीवर हल जोतो, रोपा रोपो आंदोलन करण्याचे घोषित केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रांची जिल्हा प्रशासनाने गरी परिसरात सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी घालणारे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले.