१९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या शीख दंगलीमध्ये काँग्रेसचा माजी खासदार सज्जनकुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. दिल्लीच्या राऊज अवेन्यू कोर्टाने हा निकाल दिला असून सज्जन कुमार यांच्या शिक्षेवर १८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
सरस्वती विहार भागात १ नोव्हेंबर १९८४ ला पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. सज्जन कुमार तिहारच्या जेलमध्ये आहेत. तिथूनच ते व्हिडीओ कॉन्फ्रंसद्वारे सुनावणीला हजर राहत होते.
या हत्याप्रकरणात पंजाबी बाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा तपास विशेष तपास पथकाकडे सोपविण्यात आला होता. २०२१ मध्ये म्हणजेच गुन्ह्याच्या ३६ वर्षांनी सज्जनकुमार यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. याचा निकाल आता म्हणजेच जवळपास ४० वर्षांनी लागला आहे.
हे प्रकरण काय...माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिल्लीत प्रचंड जाळपोळ, लुटमार, मारहाण करण्यात आली होती. यावेळी हत्या झालेले जसवंत आणि त्यांचा मुलगा घरातच होता. जमावाने त्यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली होती. तसेच त्यांचे साहित्य लुटले होते व घर जाळले होते. या प्रकरणातील सुनावणीनंतर न्यायालयाने सज्जन कुमार हे या घटनेत सहभागीच नव्हते तर त्यांनी या जमावाचे नेतृत्व केले होते, असे प्रथमदृष्ट्या मान्य करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे म्हटले आहे.
सज्जनकुमार यांचे वय आता ७९ वर्षे आहे. यामुळे न्यायालय त्यांना कोणती शिक्षा देते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ते तीनवेळा खासदार राहिलेले आहेत. २०१८ मध्ये कोर्टाने त्यांना शीख दंग्याप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.