मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांचं आज निधन झालं. तिरुवनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते १०१ वर्षांचे होते. अच्युतानंदन यांनी २००६ ते २०११ या काळात केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.
व्ही.एस. या नावाने प्रसिद्ध असलेल्या अच्युतानंदन हे १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीपासून स्वतंत्र होऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करणाऱ्या ३२ संस्थापकांपैकी सध्या हयात असलेल्या दोन संस्थांपक सदस्यांपैकी एक होते. २००६ साली अच्युतानंदन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या पक्षांनी केरळच्या सत्तेत पुनरागमन केलं होतं. त्यानंतर तेव्हा वयाच्या ८२ व्या वर्षी अच्युतानंदन यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं.
मागच्या काही काळापासून वाढतं वय आणि आजारपणांमुळे ते सार्वजनिक जीवनापासून दूर तिरुवनंतपुरम येथे आपल्या मुलाच्या घरी राहत होते. प्रकृतीसंबंधींच्या समस्यांमुळे ते बहुतांश वेळ घरीच राहत असत. दरम्यान, आज रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.