उत्तर प्रदेश: अयोध्येतील राम मंदिरात येणाऱ्या विदेशी भाविकांना व्हीआयपी प्रवेश सुविधा मिळणार आहे. विदेशी भाविक आता आपले पासपोर्ट दाखवून व्हीआयपी पास मिळवू शकतात आणि रामजन्मभूमीत विशेष प्रवेश मिळवू शकतात, असे राम मंदिर ट्रस्टने जाहीर केले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देश-विदेशातील भाविकांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे राम मंदिर ट्रस्ट भाविकांसाठी विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.
अयोध्येचे प्रादेशिक पर्यटन अधिकारी आरपी यादव म्हणाले की, विदेशी भाविक आपले पासपोर्ट तीर्थयात्री सेवा केंद्रात दाखवून राम मंदिरातील व्हीआयपी दर्शनासाठी पास मिळू शकतात. तसेच, गेल्या २० दिवसांत १०० हून अधिक विदेशी भाविक रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले आहेत, अशी माहितीही आरपी यादव यांनी दिली.
राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा म्हणाले, "मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी पास ट्रस्ट किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसारच दिले जातात. विदेशी नागरिक आणि अनिवासी भारतीयांना मंदिरात कोणत्याही अडचणीशिवाय प्रवेश मिळावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना सुरळीत दर्शन घेता येईल. तसेच, विदेशी भाविकांना त्यांच्या पासपोर्टचा वापर करून व्हीआयपी पास मिळू शकेल."
अधिकाऱ्यांच्या मते, प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी अनेक विदेशी आणि अनिवासी भारतीय भाविकही अयोध्येत थांबले आहेत. यातील काही भाविक आधी रामलल्ला मंदिरात दर्शन घेत आहेत. त्यानंतर प्रयागराजला रवाना होत आहेत. दरम्यान, मंदिर ट्रस्टने म्हटले आहे की, राम मंदिरात येणाऱ्या विदेशी भाविकांची संख्या सतत वाढत आहे, जी मंदिराबद्दल जागतिक रस दर्शवते.