आजपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ ला सुरुवात झाली आहे. यासाठी भाविक, साधू-संतांची मोठी गर्दी जमली आहे. पौष पौर्णिमेनिमित्त महाकुंभाचं पहिलं 'शाही स्नान' होत आहे. १४४ वर्षांतून एकदाच घडणाऱ्या या दुर्मिळ खगोलीय योगायोगाबद्दल भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
महाकुंभात सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक आले आहेत. महाकुंभाचे दिव्यत्व पाहून एका रशियन भक्ताने म्हटलं की, भारत महान आहे. आपण पहिल्यांदाच कुंभमेळ्यासाठी आलो आहोत. इथे आपल्याला खरा भारत पाहायला मिळाला. या पवित्र स्थानाच्या उर्जेने मी प्रभावित झाली आहे. मला भारत आवडतो.
केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, या महाकुंभात १५ लाखांहून अधिक परदेशी पर्यटक येण्याची अपेक्षा आहे. या भक्तांमध्ये भारतीय संस्कृती आणि श्रद्धेबद्दल खूप आदर दिसून येत आहे.
स्वच्छता आणि व्यवस्थेबद्दल प्रशंसा
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील एका भक्ताने सांगितलं की, येथील वातावरण अद्भुत आहे. रस्ते स्वच्छ आहेत आणि लोक खूप मैत्रीपूर्ण आहेत. आम्ही सनातन धर्माचं पालन करतो आणि इथे येऊन आम्हाला मिळालेला अनुभव अविस्मरणीय आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनहून महाकुंभमेळ्याला आलेली निक्की ही भक्त, येथील अद्भुत वातावरण पाहून भारावून गेली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, हा अनुभव खूप शक्तिशाली आहे. गंगा नदीवर असण्याचा आम्हाला खूप आनंद आणि आमचं भाग्य वाटत आहे.
कुंभमेळ्याला आलेल्या स्पेनमधील एका भाविकाने सांगितलं की, आमचे बरेच मित्र इथे आले आहेत - स्पेन, ब्राझील, पोर्तुगाल येथून आले आहेत. आपण एका अध्यात्मिक प्रवासात आहोत. मी पवित्र स्नान केलं आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतला. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. महाकुंभ २०२५ हा केवळ भारतीय संस्कृतीचा उत्सव नाही तर तो संपूर्ण जगाला भारताच्या आध्यात्मिक शक्ती आणि संस्कृतीची झलक दाखवत आहे.