अमेठीतील फूडपार्कवरून लोकसभेत खडाजंगी
By Admin | Updated: May 13, 2015 22:22 IST2015-05-13T22:22:25+5:302015-05-13T22:22:25+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातील फूडपार्कच्या मुद्यावर लोकसभेत बुधवारी पुन्हा वातावरण गरम झाले

अमेठीतील फूडपार्कवरून लोकसभेत खडाजंगी
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातील फूडपार्कच्या मुद्यावर लोकसभेत बुधवारी पुन्हा वातावरण गरम झाले. सरकार विकासाच्या मुद्यावर राजकीय द्वेषाचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अमेठीत फूडपार्क प्रकल्प मोदी सरकारने रद्द केल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेस आणि सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली. यापूर्वीच्या संपुआ सरकारने आणलेला हा प्रकल्प रद्द करीत किंवा पुढील काम थांबवत सरकारने राजकीय द्वेषाचे वातावरण पसरवले आहे. राजस्थानमधील एका धरण प्रकल्पाला इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आले होते. दिल्लीतील १००० खाटांच्या एम्स राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचा विस्तार करताना या सरकारने नाव बदलले आहे. हे द्वेषाचे राजकारण नाही काय? असा सवाल खरगे यांनी केला. अन्न प्रक्रियामंत्री हरसिमरत कौर यांनी दिलेल्या कारणांचा उल्लेख खरगे यांनी करताच कौर यांनी माझ्या नावाचा उल्लेख झाल्यामुळे मला उत्तर देऊ द्या असा हेका लावला.