Kerala Crime: केरळमधून एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एका अध्यात्मिक गुरूच्या घरी गोपन स्वामींनी समाधी घेतल्याचे पोस्टर लावण्यात आले होते. ७९ वर्षीय गोपन स्वामींनी समाधी घेतली, असा दावाही कुटुंबीयांनी केला होता, मात्र आजूबाजूच्या लोकांना या प्रकरणी संशय आला. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात देखील पोहोचलं. शेवटी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू गोपन स्वामी यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी केरळ पोलिसांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या घराच्या आवारात बांधलेल्या काँक्रीटच्या समाधीमधून मृतदेह बाहेर काढला आहे.
तिरुअनंतपुरममधील नेयट्टींकाराजवळ केरळ पोलिसांनी स्वयंघोषित गुरु गोपन स्वामींचा मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या कुटुंबाने त्यांना आनंददायी मृत्यु मिळाल्याचा दावा करत त्यांना एका काँक्रीटच्या चौकटीत पुरले होते. अखेर पोलिसांनी गुरुवारी गोपन स्वामींच्या मृत्यूनंतर कुटुंबाने बांधलेली काँक्रीटची समाधी तोडून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होती. फक्त अधिकृत कर्मचाऱ्यांनाच या परिसरात जाण्याची परवानगी होती.
नेयट्टींकाराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस. शाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपन स्वामींचा मृतदेह समाधीमध्ये बसलेल्या अवस्थेत सापडला होता आणि राखेने झाकलेला होता. महसूल आणि पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक सर्जन यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. चौकशीनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आला, जेणेकरून मृत्यूचे कारण समजू शकेल.
बुधवारी केरळ हायकोर्टाने मृतदेह काढण्याच्या पोलीस कारवाईला आव्हान देणारी गोपनच्या कुटुंबीयांची याचिका फेटाळून लावली होती. स्वामींच्या अचानक ‘समाधी’बद्दल स्थानिक नागरिकांनी शंका उपस्थित केली होती. त्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता स्वामींनी समाधी घेतली असल्याचे समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कुटुंबियांनी त्याला विरोध केला.
गोपन स्वामी यांना आध्यात्मिक गुरु मानत होते. त्यांनी गुरुवारी समाधी घेतल्याचा दावा केला. पाच वर्षांपूर्वी स्वामींनी बांधलेल्या समाधी पीठात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे कुटुंबियांनी सांगितले. मात्र चौकशीदरम्यान, गोपन यांचा मृत्यू कसा झाला याची माहिती कुटुंबिय देऊ शकले नाहीत. तसेचत्यांच्याकडे मृत्यूचा दाखलाही नव्हता.
गोपन यांचा मुलगा सनंदन याने सांगितले की, "वडिलांनी तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या समाधीचा अंदाज वर्तवला होता. गेल्या आठवड्यात गुरुवारी सकाळी कौटुंबिक मंदिरात रोजची पूजा केल्यानंतर ते समाधीत गेले. आम्ही दिवसभर पूजा आणि विधी करत राहिलो आणि शुक्रवारी सकाळी त्यांनी समाधीत प्रवेश केला. कृष्ण शिलेने त्यांच्या समाधीला झाकण्यात आले."
आजूबाजूच्या लोकांनी याबाबतचे पोस्टर पाहून आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी तपास सुरू करून समाधीमधून मृतदेह बाहेर काढण्यास सांगितले. त्यावेळी गोपन यांची पत्नी सुलोचना आणि मुलांनी त्यास कडाडून विरोध केला. गोपन यांच्या कुटुंबाने हिंदू नाडर समुदायाकडे पाठिंबा मागितला आणि पोलिसांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला. मात्र, हायकोर्टाने मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई पूर्ण केली आणि मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला.
दरम्यान, गोपन स्वामींच्या निधनानंतर कुटुंबीयांनी कोणालाही माहिती न देता शनिवारी परिसरात बॅनर लावून स्वामींनी समाधी घेतल्याची घोषणा केली होती. स्थानिक रहिवाशांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र आता शवविच्छेदनानंतर गोपन स्वामींच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.