इस्त्रोचे पाऊल पडते पुढे, जीएसएलव्ही मार्क ३ चे यशस्वी प्रक्षेपण
By Admin | Updated: December 18, 2014 10:43 IST2014-12-18T09:48:42+5:302014-12-18T10:43:17+5:30
चार टनाचे उपग्रह नेण्याची क्षमता असलेल्या जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाची गुरुवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली असून मार्क ३ च्या माध्यमातून इस्त्रोने अंतराळ क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले

इस्त्रोचे पाऊल पडते पुढे, जीएसएलव्ही मार्क ३ चे यशस्वी प्रक्षेपण
ऑनलाइन लोकमत
श्रीहरीकोटा, दि. १८ - मंगळ भरारी घेतल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने गुरुवारी अंतराळ क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गुरुवारी जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपक यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले असून मार्क ३ मुळे इस्त्रोला अंतराळात चार टनचे उपग्रह सोडणे शक्य झाले आहे. तसेच मार्क - ३ च्या यशस्वी चाचणीमुळे मानवाला अंतराळात पाठवण्याच्या मोहीमेतील पहिला टप्पाही पूर्ण केला आहे.
मंगल यानाची मोहीम यशस्वी ठरल्यानंतर जीएसएलव्ही मार्क ३ या रॉकेटच्या प्रक्षेपण चाचणीसाठी इस्त्रोने जय्यत तयारी सुरु केली होती. या यानाच्या माध्यमातून मानवरहित अवकाश कुपीचीही चाचणी घेण्यात येणार असल्याने इस्त्रोच्या दृष्टीने हे प्रायोगिक प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे होते. गुरुवारी श्रीहरिकोटा येथील तळावर जीएसएलव्ही मार्क ३ चे यशस्वीरित्या प्रायोगिक प्रक्षेपण करण्यात आले. २० मिनीटांनी अवकाश कुपी बंगालच्या उपसागरात उतरवण्यात आली व इस्त्रोची ही चाचणी यशस्वी झाल्याचे इस्त्रोच्या प्रमुखांनी जाहीर केले.
जीएसएलव्ही मार्क ३ चे वैशिष्ट्य
> भारताकडे सध्या दोन टनापेक्षा अधिक वजन असलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची क्षमता नसल्याने इस्त्रोला विदेशातील अंतराळ संस्थावर अवलंबून राहावे लागत होते. आता जीएसएलव्ही मार्क ३ या रॉकेटच्या माध्यमातून इस्त्रोला अंतराळामध्ये ४ हजार किलोचे उपग्रह सोडणे शक्य होणार आहे.
> मार्क ३ च्या माध्यमातून अवकाश कुपीही (स्पेस कॅप्सूल) अंतराळात सोडणे शक्य झाल्याने अंतराळात मानवाला पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेतील पहिला टप्पाही इस्त्रोने पूर्ण केला. अवकाश कुपीमध्ये दोन जणांना अंतराळात पाठवता येईल.
> २०१६ मधील चंद्रयान - २ आणि मंगलायन - २ चे प्रक्षेपणही मार्क - ३ च्या मदतीने करणे शक्य होणार आहे.