ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २८ - 'कामावर लक्ष द्या, संसदेचे नियम पाळा आणि मीडियाशी बोलताना वादग्रस्त वक्तव्ये टाळा', असा त्रि:सूत्री सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिला. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी फरीदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी खासदारांना अनेक महत्वाच्या मुद्यांवर संबोधित केले. ते म्हणाले 'मी स्व पहिल्यांदाच खासदार बनलो असून सध्या पंतप्रधान कार्यालयात प्रशिक्षण घेतो आहे.' 'संसदेतील चर्चेत सहभागी होण्यापूर्वी संबंधित विषयाचा व्यवस्थि अभ्यास करून मगच मत मांडा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. स्वतःच्या मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य द्या, मीडियाशी बोलताना स्वतःच्या मतदारसंघापुरते बोला, तसेच वादग्रस्त वक्तव्य करणे टाळा असेही ते म्हणाले. जनतेच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे सरकारच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवा. त्यात काहीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा, असेही त्यांनी खासदारांना सांगितले.
सूरजकुंड येथे सुरू असलेल्या दोन दिवसांच्या या मार्गदर्शन सत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. या कार्यशाळेत खासदारांना संसदेतील कामकाज, त्यातील कामे, सत्तारूढ पक्षाच्या खासदारांच्या जबाबदा-या, संसदेत कुठला प्रश्न कशाप्रकारे मांडावा, शिस्तीचे पालन कसे करावे याबाबत ज्येष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. रविवारी संध्याकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या भाषणाने या कार्यशाळेचा समारोप होईल.