उड्डाणपूल दुर्घटना; ५ जण ताब्यात
By Admin | Updated: April 2, 2016 01:52 IST2016-04-02T01:52:51+5:302016-04-02T01:52:51+5:30
कोलकात्यातील अपघातग्रस्त उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या हैदराबादच्या आयव्हीआरसीएल या कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली

उड्डाणपूल दुर्घटना; ५ जण ताब्यात
कोलकाता : कोलकात्यातील अपघातग्रस्त उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या हैदराबादच्या आयव्हीआरसीएल या कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीच्या कोलकात्यातील कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे.
दरम्यान, कोलकाता पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गुरुवारी रात्रभर मदतकार्य करून पुलाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले.
दोन आॅटोरिक्षा आणि उद्धवस्त काही वाहने बाहेर काढण्यात आली. केवळ एक ट्रक आतमध्ये अडकून पडलेला आहे. जखमींची संख्या सुमारे ९० असून त्यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. (वृत्तसंस्था)