फ्लोराईडग्रस्त गावांतील लोकांना मिळणार शुद्ध पाणी

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:00+5:302015-02-13T23:11:00+5:30

Fluoride affected people get pure water | फ्लोराईडग्रस्त गावांतील लोकांना मिळणार शुद्ध पाणी

फ्लोराईडग्रस्त गावांतील लोकांना मिळणार शुद्ध पाणी

>पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : जलशुद्धीकरण यंत्रे लावणार
नागपूर : जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त व पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसलेल्या गावांतील लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जलशुद्धीकरण यंत्रे उपलब्ध केली जाणार आहेत. यासाठी २३ गावांची निवड करण्यात आली आहे.
फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने लोकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. हाडाचे व दातांचे आजार होतात. अशा रुग्णांना अकाली वृद्धत्व येते, परंतु पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील २३ गावांतील लोकांना या पाण्याचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या गुणवत्ता सल्लागार राधा रहांगडाले व अनिल राजदार यांनी ८००० पाणी नमुने गोळा केले. प्रयोगशाळेत तपासणी केली असता यातील ९८५ प्रदूषित आढळून आलेले आहेत. यात २३ गावांतील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण अधिक आहे. या गावांना पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करणारी यंत्रे दिली जाणार आहेत. यात हिंगणा तालुक्यातील ८, भिवापूर ३, कामठी, नागपूर ग्रामीण व पारशिवनी तालुक्यातील प्रत्येकी १, उमरेड ३ तर रामटेक तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे(प्रतिनिधी).
चौकट...
उन्हाळ्यात अधिक प्रमाण
फ्लोराईडग्रस्त गावातील भूगर्भातील पाण्यात पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात फ्लोराईडयुक्त पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पावसाळ्याआधी व पावसाळ्यात असे दोनवेळा तपासणीसाठी नमुने घेतले जातात.
चौकट..
जलशुद्धीकरण यंत्रे लावणार
जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त २३ गावांत जलशुद्धीकरण यंत्रे लावली जाणार आहेत. बांध वा अन्य उपाययोजना करून पावसाचे पाणी अडवल्यास भूगर्भातील पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी होते. अशा पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करावी, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांनी केले आहे.

Web Title: Fluoride affected people get pure water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.