जम्मू काश्मीरमध्ये पुराचा धोका, दरड कोसळून १० ठार
By Admin | Updated: March 30, 2015 12:59 IST2015-03-30T10:13:35+5:302015-03-30T12:59:50+5:30
गेल्या वर्षी आलेल्या महाकाय पुरातून सावरत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुराचे संकट निर्माण झाले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पुराचा धोका, दरड कोसळून १० ठार
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ३० - गेल्या वर्षी आलेल्या महाकाय पुरातून सावरत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुराचे संकट निर्माण झाले आहे. झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरातील अनेक भागांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भूस्खलानाच्या घटनांनी महामार्गावरील वाहतूकही खोळंबली आहे. रविवारी दरड कोसळल्याने १८ घरांसह ४४ इमारतींचे नुकसान झाले. अद्याप या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली. दक्षिण काश्मीर व श्रीनगर येथे झेलम नदीने अनुक्रमे २२.४ फूट व १८.८ फूटांची पातळी गाठली आहे. नदीने २३ फूटांची पातळी ओलांडल्यास पुन्हा हाहाकार माजेल अशी भीती वर्तवली जात आहे. जम्मू काश्मीरमधील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या ९५ जवानांना जम्मू काश्मीरमध्ये पाठवले आहे. पावसामुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सोमवारी सकाळी बडगाम जिल्ह्यात चार घरांवर दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगा-याखाली आणखी २० जण अडकले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही जम्मू काश्मीरला पुराचा तडाखा बसला होता. त्यावेळी जम्मू काश्मीरचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले व शेकडो लोकांना जीवही गमवावा लागला होता.