उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे आणि पूर आला आहे. याच दरम्यान एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक वडील आपल्या लहान मुलाला वासुदेवासारखं हातात घेऊन पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी जाताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे, ज्याने लोकांचं लक्ष वेधलं आहे आणि प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुरामुळे प्रयागराजमधील जनजीवन विस्कळीत झालं असून लोकांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागत आहे. मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. लोकांचं मोठं नुकसान झालं आहे.
छोटा बघाडा परिसरामध्ये एका कुटुंबाने आपल्या बाळाला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी असामान्य धाडस दाखवलं. जेव्हा वेळेवर कोणतीही सरकारी मदत पोहोचली नाही, तेव्हा कुटुंबाने नवजात बाळाला वर हातात उचलून घेतलं आणि पूरग्रस्त परिसरातून बाहेर काढलं. कोणीतरी या दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला, जो आता व्हायरल होत आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या दृश्याने त्यांना भगवान कृष्णाच्या जन्माची गोष्ट आठवली, जेव्हा वासुदेवांनी यमुना नदी ओलांडली आणि कृष्णाचा जीव वाचवला होता असं म्हटलं. काही लोक हा व्हिडीओ पाहून भावूक झाले. पुराच्या पाण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी लोकांना घरं सोडावी लागली. सुमारे तीन हजार लोक बेघर झाले आहेत. प्रशासनाने मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू केलं आहे. १२ बोटी आणि एनडीआरएफ पथकं तैनात केली आहेत.