Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 11:23 AM2019-08-11T11:23:27+5:302019-08-11T11:26:05+5:30

महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

flood hits worst 4 states more than 125 killed | Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू

Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.आतापर्यंत 125 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या राज्यांमध्ये आतापर्यंत 125 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये 57, महाराष्ट्रात 27, गुजरातमध्ये 22, कर्नाटक 24 तसेच इतरही अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने दक्षिणेतील राज्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.  

मुसळधार पावसाचा फटका हा सार्वजनिक मालमत्तेला बसला आहे. तसेच घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लष्कराच्या बचाव पथकांना मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पूरग्रस्त बेळगावची हवाई पाहणी करणार आहेत. केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून, पूर आणि भूस्खलन व पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षितपणे शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे.

कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सुरू झालेला विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेला पूर ओसरू लागला असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, तसेच पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लीटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. पूरस्थिती उद्भवल्यानंतर पाचव्या दिवशी सरकारी यंत्रणा जोमाने मदत कार्यास लागली. 

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे शाळा अथवा अन्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेत शासनाने 154 कोटींचा निधीही वर्ग केला असून, पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर तो जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. 

कर्नाटकात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने शनिवारी पूरस्थिती आणखी गंभीर बनली आहे. तथापि, नागरिकांनी काळजी करू नये, सरकार सर्वतोपरी मदत करील, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.मदत आणि पुनर्वसन ही आमची प्राथमिकता आहे. राज्यात आतापर्यंत काही जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. अर्थमंत्रालयाने मदतीसाठी तात्काळ 100 कोटी रुपये जारी केले आहेत. 

मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराने 6000 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 45 वर्षांतील हा सर्वात मोठा पूर आहे. आम्ही केंद्र 3000 कोटी रुपयांची मागणी केली आहे. काही गावांची तर पूर्णपणे नव्याने उभारणी करण्याची गरज आहे. आतापर्यंत पावसाशी संबंधित घटनांत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

+

 

Web Title: flood hits worst 4 states more than 125 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.