दिल्लीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर
By Admin | Updated: January 2, 2015 02:30 IST2015-01-02T02:30:09+5:302015-01-02T02:30:09+5:30
काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या २४ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली.

दिल्लीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर
नवी दिल्ली : काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या २४ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत काँग्रेसने सर्व आठही विद्यमान आमदारांसह २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या स्थानी राहिलेल्या पक्षाच्या १२ उमेदवारांना स्थान दिले आहे.
दिल्लीत अद्याप विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्याच्या प्रकियेदरम्यान उमेदवारांची यादी जाहीर करण्याची काँग्रेसची आतापर्यंतची परंपरा आहे. परंतु ही परंपरा मोडित काढत काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव चाखावा लागला होता आणि पक्षाच्या १५ वर्षे जुन्या सरकारचे नेतृत्व करीत असलेल्या शीला दीक्षित आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या.
काँग्रेसने अद्याप नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील आपला उमेदवार जाहीर केला नाही.
यावेळी दीक्षित निवडणूक लढणार नाहीत; पण त्या प्रचार करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)