Shimla NHAI Official Assault Case: हिमाचल प्रदेशचे पंचायती राज मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्याविरुद्ध शिमला येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक आणि साइट अभियंता यांना एका खोलीत नेऊन मारहाण केल्याचा आरोप आहे. अनिरुद्ध सिंह यांनी अधिकाऱ्याच्या डोक्यात मडक्याने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सर्व प्रकारानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. नितीन गडकरी यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे.
हिमाचल प्रदेशचे कॅबिनेट मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्याविरोधात एनएचएआयचे व्यवस्थापक अचल जिंदाल यांनी धाली पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. शिमला ग्रामीण भागातील भट्टाकुफर भागात चार पदरी बांधकाम सुरु असताना एक पाच मजली घर कोसळ्यानंतर हा सगळा प्रकार घडला. याप्रकरणी अनिरुद्ध सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणाची दखल घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
एनएचएआयचे शिमला प्रकल्प व्यवस्थापक अचल जिंदाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी ११:३० वाजता उपविभागीय दंडाधिकारी शिमला ग्रामीण यांच्या कार्यालयात बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांच्यासोबत साइट इंजिनिअर योगेश देखील उपस्थित होते. दंडाधिकारी कार्यालयात नसल्याने दोन्ही अधिकाऱ्यांना भट्टाकुफर येथे बोलावण्यात आले, जिथे मंत्री अनिरुद्ध सिंह आणि इतर स्थानिक लोक आधीच उपस्थित होते. त्यावेळी रिकामी करण्यात आलेली इमारत घटनास्थळी कोसळल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात येत होती. माहिती देत असतानाच मंत्र्यांनी अपशब्द वापरण्यास सुरुवात केली आणि जवळच्या खोलीत नेऊन स्थानिकांच्या उपस्थितीत मारहाण करण्यात आली. डोक्यावर पाण्याच्या मडक्याने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांच्यासोबत असलेले साईट इंजिनिअर योगेश यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली.
हा सर्व प्रकार घडला त्यावेळी दंडाधिकारी आणि इतर अधिकारी तिथेच उपस्थित होते. पण कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असेही तक्रारीत म्हटलं आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांचा जीव वाचवला आणि गाडीने रुग्णालय गाठले. या प्रकरणी एनएचएआयने पोलिसांकडे योग्य कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी अनिरुद्ध सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
नितीन गडकरींनी काय म्हटलं?
"हिमाचल प्रदेशचे पंचायती राज मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कथितरित्या अचल जिंदाल यांच्यावर केलेला क्रूर हल्ला अत्यंत निंदनीय आणि कायद्याच्या राज्याचा अपमान करणारा आहे. सरकारी कर्तव्ये पार पाडत असताना एका सरकारी कर्मचाऱ्यावर असा क्रूर हल्ला वैयक्तिक सुरक्षिततेला धक्का देत आहे. मी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांच्याशी बोललो आहे, त्यांना सर्व दोषींवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे," असं नितीन गडकरी म्हणाले.