कुश हत्याकांडावर बुधवारपासून अंतिम सुनावणी

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:58+5:302015-02-21T00:49:58+5:30

हायकोर्ट : फाशीची शिक्षा देण्यासाठी शासनाचे अपील

Final hearing from Kush killer Wednesday | कुश हत्याकांडावर बुधवारपासून अंतिम सुनावणी

कुश हत्याकांडावर बुधवारपासून अंतिम सुनावणी

यकोर्ट : फाशीची शिक्षा देण्यासाठी शासनाचे अपील

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभर गाजलेल्या हृदयद्रावक कुश कटारिया हत्याकांडावर २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्या न्यायपीठासमक्ष प्रकरण ऐकले जाणार आहे. हे प्रकरण १५ ऑक्टोबर २०१३ रोजी अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आले होते.
आयुष निर्मल पुगलिया (वय २४) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. सत्र न्यायालयाने आयुषला अपहरण, हत्या व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) मधून त्याला दोषमुक्त करण्यात आले आहे. आयुषने त्याच्या शिक्षेला उच्च न्यायालयात अपील करून आव्हान दिले आहे. याशिवाय शासनाच्या दोन अपील आहेत. एक अपील आयुषला फाशीची शिक्षा देण्यासाठी, तर दुसरे अपील भादंविच्या कलम ३६४ (अ)मधून सुटकेला आव्हान देणारे आहे. शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी ॲड. राजेंद्र डागा यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही घटना ११ ऑक्टोबर २०११ रोजीची आहे. सुरुची मसाला कंपनीचे संचालक राजू ऊर्फ प्रशांत कटारिया यांचा सात वर्षीय मुलगा कुश हा शुभम बैद व रिदम पुरिया या दोन मित्रांसोबत खेळत होता. तेवढ्यात आयुषने चॉकलेटचे आमिष दाखवून कुशला सूर्यनगरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या आवारात नेले. तेथे आधी कुशच्या डोक्यावर विटेने प्रहार केला व नंतर त्याचा कटरने गळा कापला. कुशचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला. आयुषने दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कुशचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
-----------------------
चौकट.....
फर्लोवरील सुनावणी तहकूब
आयुष पुगलियाने संचित रजेसाठी (फर्लो) उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी उत्तर सादर करण्यासाठी शासनाकडून शुक्रवारी एक आठवड्याचा वेळ मागण्यात आल्यामुळे न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. कारागृह प्रशासनाने आयुषचा रजेचा अर्ज फेटाळला आहे. या निर्णयाला त्याने आव्हान दिले आहे.

Web Title: Final hearing from Kush killer Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.