राजघराण्यातील वादातून गोळीबार
By Admin | Updated: September 15, 2014 03:30 IST2014-09-15T03:30:35+5:302014-09-15T03:30:35+5:30
अमेठीच्या भूपती भवनचे वारसदार आणि काँग्रेसचे खासदार संजय सिंग आणि त्यांची पत्नी गरिमा सिंग यांच्यात वारसा हक्कावरून सुरू असलेल्या वादाने रविवारी हिंसक वळण घेतले

राजघराण्यातील वादातून गोळीबार
अमेठी : अमेठीच्या भूपती भवनचे वारसदार आणि काँग्रेसचे खासदार संजय सिंग आणि त्यांची पत्नी गरिमा सिंग यांच्यात वारसा हक्कावरून सुरू असलेल्या वादाने रविवारी हिंसक वळण घेतले. भूपती भवनाबाहेर संजय सिंग यांचे पुत्र अनंत विक्रमसिंग आणि पोलीस यांच्यात झालेल्या तुफान संघर्षात पोलीस कॉन्स्टेबल मारला गेला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली.
या हिंसाचारात सामील असलेल्या १८ जणांना अटक करण्यात आली आहे आणि संपूर्ण परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. संपूर्ण घटनेचे व्हिडियो चित्रण करण्यात आले आहे. ते पाहिल्यावर आणखी काही लोकांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक हिरालाल यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे खासदार संजय सिंग आणि त्यांची पत्नी अमिता अमेठीला येणार असल्याचे कळल्यावर अनंत विक्रम सिंग यांचे समर्थक भूपती भवनासमोर गोळा झाले. अनंत विक्रम यांनी आपली आई व संजय सिंग यांची पहिली पत्नी गरिमा यांच्यासोबत या भूपती भवनाचा आधीपासूनच ताबा घेतलेला आहे. संजय सिंग आणि त्यांची दुसरी पत्नी अमिता आणि अनंत विक्रम सिंग व गरिमा यांच्या दरम्यान वारसाहक्कावरून वाद सुरू आहे.
वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आलेले खासदार संजय सिंग हे पत्नी अमिता यांच्यासोबत भूपती भवन येथे पोहोचले. यावेळी अनंत विक्रम यांच्या समर्थकांनी या दोघांनाही भवनात प्रवेश करण्यापासून रोखले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला तेव्हा जमाव व पोलीस यांच्यात संघर्ष उडाला. या दरम्यान जमावातून गोळीबार करण्यात आला, ज्यात विजय मिश्रा (४५) हा पोलीस कॉन्स्टेबल ठार झाला. (वृत्तसंस्था)