Fight After Watching Saiyaara:बॉलिवूड चित्रपट 'सैयारा' सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतोय. देशभरातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 'सैयारा' चित्रपट पाहिल्यानंतर थिएटरबाहेर दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
सैयारा चित्रपटाने रिलीज झाल्यापासून १६५.४६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तरुणांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहून अनेकजण थिएटरमध्येच ढसाढसा रडतही आहेत. अशातच, ग्वाल्हेरमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. 'सैयारा' चित्रपट पाहिल्यानंतर दोन तरुणांमध्ये प्रेयसीवरुन तुंबळा हाणामारी झाली. वाद इतका वाढला की, दोघांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
या दोघांमधील भांडण पाहण्यासाठी थिएटरबाहेर बघ्यांची मोठी गर्दी जमली. काही लोकांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही शांत होत नव्हते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मारहाणीची ही घटना मोबाईलमध्ये कैद करुन सोशल मीडियावर व्हायरल केली. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेबाबत अद्याप पोलिसांकडे कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही.