Kerala Bus Accident:केरळमध्ये एका शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील वलक्काई येथे बुधवारी स्कूल बस उलटल्याने एका ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर अन्य १८ विद्यार्थी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रवास करत असलेला विद्यार्थीनी खिडकीतून खाली पडली आणि बसखाली दबून तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील वलक्काई भागात बुधवारी संध्याकाळी हा हृदयद्रावक अपघात घडला. शाळेची बस उलटल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर अन्य १८ विद्यार्थी जखमी झाले. नेध्या एस राजेश असे मृताचे नाव असून ती पाचवीत शिकत होती. वलक्काई पुलाजवळ बसचे उतारावरून नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याची भीषण घटना घडली.
अपघाताच्या वेळी ही बस कुरुमाथूर चिन्मय शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टीनंतर त्यांच्या घरी सोडण्यासाठी जात होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या वाहनाला रस्ता देताना उतारावर बसचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर उलटली. १३ गंभीर विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
"बुधवारी संध्याकाळी कन्नूरच्या वलक्काई येथे स्कूल बस उलटल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आणि १८ विद्यार्थी जखमी झाले. नेध्या एस राजेश असे मृताचे नाव असून ती पाचवीत शिकत होती. वलक्काई पुलाजवळ बसचे उतारावर नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याची घटना घडली. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस कुरुमाथूर चिन्मय शाळेची होती आणि विद्यार्थ्यांना घरी घेऊन जात होती. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले," अशी माहिती केरळच्या जनसंपर्क विभागाने दिली.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हटलं जात आहे. परंतु पोलिसांनी सविस्तर तपास सुरू असल्याचे सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी तळीपारंबा तालुका रुग्णालयात नेले. मुलीचा मृतदेह परियाराम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे.