हैदराबादमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका निर्दयी बापाने कौटुंबिक वादातून आपल्या निष्पाप मुलाचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय मोहम्मद अकबरने अडीच वर्षांच्या मोहम्मद अनस या आपल्या मुलाचा गळा दाबून खून केला.
अकबर हा त्याची पत्नी सना बेगम हिच्यासोबत अनेकदा वाद घालायचा आणि मुलाच्या आजारपणासाठी तिला जबाबदार धरायचा. शुक्रवारी रात्री, जेव्हा सना कामावर गेली होती, तेव्हा अकबरने आपल्याच मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने मुलाचा मृतदेह एका पोत्यात भरला, दुचाकीवर नेला आणि नयापुलजवळील मुसी नदीत फेकून दिला.
सुरुवातीला, अकबरने आपल्या मुलाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर, त्याच्या मोबाईल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजमधून हा क्रूर गुन्हा उघडकीस आला. त्यानंतर, अकबरने आपला गुन्हा कबूल केला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलाचा मृतदेह शोधण्यासाठी मुसी नदीत शोधकार्य सुरू आहे.