सुसेरीत शेतकर्याचा दागिन्यासाठी खून
By Admin | Updated: February 3, 2015 00:06 IST2015-02-02T23:52:52+5:302015-02-03T00:06:00+5:30

सुसेरीत शेतकर्याचा दागिन्यासाठी खून
खेड : खेड तालुक्यातील सुसेरी गावातील संतोष बाळकृष्ण केसरकर (वय ५०) या शेतकर्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी गावातील खेमनाथ मंदिरानजीक आढळल्याने खळबळ उडाली आहे. गळा दाबून त्यांचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे दागिन्यांसाठी केेसळकर यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
संतोष बाळकृष्ण केसरकर हे शेळ्यांना चरविण्यासाठी गावातील रानात घेऊन गेले होते. मात्र, ते परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने शोधाशोध केली. तेव्हा त्यांचा मृतदेह खेमनाथ मंदिरानजीक आढळला. तिने तातडीने ही माहिती ग्रामस्थांना व त्यानंतर पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले, पोलीस निरीक्षक अशोक जांभळे तसेच पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ आपल्या सहकार्यांसह सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे घटनेची माहिती दिल्यानंतर तब्बल दोन तास उशिराने पोलीस अधिकारी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत हा पंचनामा सुरूच असल्याने अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, केसरकर यांच्या अंगावरील दागिने गायब होते. त्यामुळे त्यांचा दागिन्यांसाठी खून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)