Haryana Crime: हरियाणामध्ये लग्नाच्या दोन दिवस आधीच होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने नवरदेवाला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत नवरदेव जबर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु असून तो व्हेटिंलेटरवर आहे. तरुणीने तिच्या प्रियकरासह मिळून तिच्या लग्नाच्या दोन दिवस आधी तिच्या होणाऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्या तरुणाचे हात आणि पाय तुटले असून त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकारानंतर तरुणाच्या कुटुंबियांनी हल्लेखोर प्रियकर आणि तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.
हरियाणातील फरिदाबादच्या आयएमटी भागात हा सगळा प्रकार घडला. हा तरुण ज्या तरुणीसोबत लग्नाची स्वप्ने पाहत होता तिच्यामुळे आज तो कोमात आहे. तीन दिवसांपूर्वी साखरपुडा झाल्यानंतर लग्नाच्या आधीच ही घटना घडली आणि तो मृत्यूशी झुंज देत आहे. तरुणीने मुलाचे हात पाय तोडायला लावले असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
गौरव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो आयटीआय शिक्षक आहे. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, गौरवचे १५ एप्रिल रोजी एका मुलीशी साखरपुडा झाला होता आणि त्यांचे लग्न १९ एप्रिल रोजी होणार होते. लग्नाची तयारी जोरात सुरू होती, मात्र गौरवला त्याच्या सोबत पुढे काय घडणार आहे याची पुसटशी कल्पना नव्हती. जखमी गौरव मृत्यूशी झुंज देत आहे. गौरवच्या होणार्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून हा हल्ला करण्याचा कट रचला होता, असा कुटुंबाचा आरोप आहे.
तरुणीने गौरवचा फोटो आणि पत्ता तिचा प्रियकर सौरव नागरला पाठवला आणि तिच्या लग्नाबद्दल सांगितले होते. याचा रागाच्या भरात सौरभने त्याचा मित्र सोनू आणि इतर तिघांसह आयएमटी परिसरात घरी परतत असताना गौरववर काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गौरवच्या हातपायांच्या अनेक भागात फ्रॅक्चर झाले. डोक्यावर आणि पाठीवरही गंभीर जखमा होत्या. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. आजूबाजू्च्या काही लोकांनी जखमी गौरवला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र तो कोमात गेला.
आरोपी सौरवने महिन्यापूर्वी गौरवला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र गावकऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण मिटले. १९ एप्रिल रोजी दोघांचे लग्न होणार असल्याने सौरवने गौरववर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी गौरवच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि अंगठीही हिसकावून घेतली. घटनेची माहिती मिळताच गौरवच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी सौरव नगर, सोनू आणि तीन अज्ञात लोकांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. दुसरीकडे सौरव आणि तरुणी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.