घरच्यांचा विरोध असल्याने अनेकदा मुलगा आणि मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करतात. बिहारमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. कुटुंबीयांच्या संमतीने लग्न ठरलं होतं, लग्नाला फक्त एक महिना बाकी असताना एका तरुणाने पळून जाऊन मंदिरात लग्न केलं आहे. मात्र हे जोडपं एक महिनाही वाट पाहू शकलं नाही आणि त्यांनी मंदिरात जाऊन त्यांच्या कुटुंबियांना न सांगता लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा ते दोघे घरी पोहोचले तेव्हा कुटुंब आणि गावकरी आश्चर्यचकित झाले. लग्नाला फक्त एक महिना उरला आहे, मग पळून जाऊन लग्न करण्याची काय गरज होती? असा प्रश्न आता सर्वजण विचारत आहेत.
९ मे रोजी होणार होतं लग्न
जमुई जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील अंबा गावात ही घटना घडली आहे. लग्नाच्या एक महिना आधी दोघे मंदिरात लग्न करून अचानक घरी पोहोचले, लग्न झालेलं पाहून कुटुंबातील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. कुटुंबाने अंबा गावातील रहिवासी दशरथ मंडल यांचा मुलगा अजित कुमारचं लग्न खैरा ब्लॉकमधील सग्धाहा गावातील रहिवासी प्रकाश रावत यांची मुलगी अंजली कुमारीशी ठरलं होतं. ९ मे रोजी लग्न होणार होतं. लग्न ठरल्यानंतर अजित आणि अंजली फोनवर बोलू लागले.
सहन झाला नाही दुरावा
एकमेकांशी फोनवर बोलत असताना त्यांना दुरावा सहन होत नव्हता. अजित गाडी घेऊन अंजलीच्या घरी पोहोचला. त्यानंतर दोघांनीही नवीनगर येथील दुर्गा मंदिरात लग्न केलं. मात्र गुरुवारी रात्री मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी अजितच्या घरी पोहोचून अंजलीला सोबत घेऊन जाण्याचा आग्रह धरला, परंतु अंजली जाण्यास तयार झाली नाही. त्यानंतर शुक्रवारी पाटणेश्वर धाम मंदिरात दोन्ही कुटुंबांच्या सहकार्याने पुन्हा लग्न केलं.
अंजलीच्या कुटुंबाने तिची पाठवणी केली. हे अनोखं लग्न चर्चेचा विषय राहिले. अजित आणि अंजली यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरल्यानंतर दोघंही दिवसभर मोबाईलवर बोलत होते. दोघांनाही वाटलं की, आता ते एक मिनिटही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी घरातून पळून जाऊन मंदिरात लग्न केलं आहे.