भारतातील जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करून चोख उत्तर दिले. मात्र,या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने सीमावर्ती भागांमध्ये बेछूट गोळीबार आणि हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानला त्यांच्या प्रत्येक हल्ल्याचे प्रत्युत्तर देत आहे. इतकंच नाही तर, भारताने पाकचे सगळे हल्ले परतवून लावले आहेत. दरम्यान आता पाककडून काही चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीय वायुसेनेच्या पायलट शिवानी सिंह यांना पाकिस्तानने पकडले आहे. मात्र, हा दावा खोटा ठरला आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (PIB) सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांचं पितळ उघड पाडलं आहे. या दाव्यामागची सत्यता सांगताना पीआयबीने पाकचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे. परंतु, संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, अशी कोणतीही घटना घडलेली नाही आणि स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंह पूर्णपणे सुरक्षित आहे. पीआयबीने देशातील लोकांना या माहितीकडे दुर्लक्ष करण्याचे आणि असे खोटे मेसेज पुढे शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे.
पाकचा दावा खोटा!
पाकिस्तानने भारतीय वायुसेनेच्या स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंह या पकडल्याचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे. पीआयबी आणि संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, त्या भारतात सुरक्षित असून, आपले कर्तव्य बजावत आहेत. बनावट सोशल मीडिया अकाउंट्स आणि पाकिस्तान समर्थित अफवा पसरवणाऱ्यांनी लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ही बातमी व्हायरल केली. तर, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ही भारत सरकारची अधिकृत माहिती संस्था आहे, जी बनावट बातम्या तपासते आणि जनतेला अचूक माहिती प्रदान करते. या संस्थेने यामागचे सत्य शोधून काढले आहे.