शहांना सरकारनेच पाडले तोंडघशी
By Admin | Updated: December 4, 2014 00:59 IST2014-12-04T00:59:15+5:302014-12-04T00:59:15+5:30
शारदा चिटफंड आणि दहशतवादाच्या संबंधांवर भाजपाप्रणीत सरकारमध्ये वेगवेगळे सूर आळवले जाऊ लागले आहेत़

शहांना सरकारनेच पाडले तोंडघशी
नवी दिल्ली : शारदा चिटफंड आणि दहशतवादाच्या संबंधांवर भाजपाप्रणीत सरकारमध्ये वेगवेगळे सूर आळवले जाऊ लागले आहेत़ शारदा चिटफंडाचा पैसा बांगलादेशातील अतिरेक्यांना पुरविला जात असल्याचा आरोप रविवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला होता़ बुधवारी लोकसभेत मोदी सरकार शहा यांच्या या विधानापासून स्वत:ला नामानिराळे करताना दिसले़
‘आतापर्यंतच्या तपासात शारदा चिटफंड घोटाळ्याचा संबंध दहशतवादाशी असल्याचे कुठलेही धागेदोरे गवसलेले नाहीत़ या घोटाळ्याचा पैसा बांगलादेशातील अतिरेक्यांना पुरविला जातो, याबाबतही तपासात काहीही आढळलेले नाही’, अशी स्पष्टोक्ती लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल कार्मिक आणि प्रशिक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली़
यापूर्वी कोलकाता येथील एका रॅलीत भाजपाध्यक्ष शहा यांनी शारदा चिटफंडाचा पैसा बर्धवान स्फोटासाठी वापरण्यात आल्याचा आरोप केला होता़ या स्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या मार्गात अडचणी आणल्या जात असल्याचे सांगत त्यांनी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)