गेल्या काही काळापासून नात्यात फसवणूक, विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण कमालीचं वाढलेलं आहे. त्यामुळे नात्यात अविश्वास, वादविवाद वाढू लागले आहेत. दरम्यान, अशाच एका रंगेल पतीला त्याच्या पत्नीने चांगलीच अद्दल घडवल्याची घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. या पत्नीला तिच्या पतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे तिने पतीच्या चारित्र्याची पडताळणी करण्यासाठी सोशल मीडियावर एक बनावट प्रोफाईल तयार केली. तसेच त्या माध्यमातून दोन महिने ती पतीसोबत बोलत होती. अखेरीस जेव्हा हा पती त्याच्या कथित गर्लफ्रेंडला भेटायला पोहोचला तेव्हा पत्नीला समोर पाहून त्याला धक्काच बसला. तसेच पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण होऊन हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. अखेरीस तिथे या दोघांचंही समुपदेशन करून त्यांच्यातील भांडण मिटवण्यात आलं.
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधील माधौगंज परिसरातील हे संपूर्ण प्रकरण असून, येथील एका २३ वर्षय तरुणीचा विवाह एका खाजगी कंपतीन काम करणाऱ्या तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पतीच्या वर्तणुकीमुळे तिला शंका येऊ लागली. तिचा पती नेहमी फोनवर गुंतलेला असायचा. तसेच ततो आपला मोबाईलसुद्धा लॉक करून ठेवायचा. रात्री उशिरापर्यंत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करायचा. त्यामुळे पत्नीचा संशय आणखीच वाढला. मात्र मी तर केवळ तुझाच आहे, म्हणून पती तिची समजूत काढायचा.
त्यामुळे पतीचं पितळ उघडं पाडून त्याला रंगेहात पकडण्यासाठी पत्नीने एक खास योजना आखली. तिने एका नव्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅप सुरू केलं. तसेच फेसबूकवर एक बनावट प्रोफाईल बनवली. त्यावरून तिने पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिचा डाव यशस्वी ठरला आणि पती तिच्या जाळ्यात फसला. त्याने नवी मैत्रिण समजून पत्नीच्या फेक आयडीसोबत चॅटिंग करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, त्याने आपण अविवाहित असल्याचे सांगितले. तसेच आपण एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो, असेही सांगितले.
सुमारे दोन महिने त्यांच्या गप्पा सुरू होत्या. एकेदिवशी या पतीने फोनवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा पत्नीने बहिणीकडून आवाज बदलून त्याच्यासोबत बोलून घेतलं. शेवटी त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये भेटण्याचे ठरवले. हा पती तयारीनिशी रेस्टॉरंटमध्ये गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पोहोचला. तेव्हा त्याने तिथे त्याच्या पत्नीला बसलेलं पाहिलं. तू जिला भेटायला आला आहेस, ती मीच आहे, असे पत्नीने त्याला सांगितलं तेव्हा त्याला धक्काच बसला. त्यानंतर दोघांमध्ये वादावादी होऊन प्रकरण पोलिसांत पोहोचले. अखेरीस पोलिसांनी समुपदेशन करत पती-पत्नीमधील वाद मिटवला.