केरळमधील पलक्कड येथील वडकंथरा येथील एका शाळेच्या गेटजवळ स्फोट झाल्याने एकच खळबळ माजली. शाळेच्या गेटजवळ एका विद्यार्थ्याला स्फोटके दिसली, ज्याचा वापर रानडुकरांना मारण्यासाठी करतात. स्फोटके सापडल्याने उत्साहित होऊन विद्यार्थ्याने त्यातील एक जमिनीवर फेकले आणि स्फोट झाला. या स्फोटात विद्यार्थी आणि जवळ उभ्या असलेल्या एका वृद्ध महिलेला किरकोळ दुखापत झाली. जखमींना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, वडकंथरा येथील व्यास विद्या पीडोम प्री-प्रायमरी स्कूलचा १० वर्षीय विद्यार्थी नारायणला दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली. नारायणने त्यातील एक जमिनीवर फेकल्यानंतर मोठा आवाज झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. शाळेचे अधिकारी आणि स्थानिक रहिवासी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता त्यांना बादलीत चार स्फोटके सापडली.
गुन्हा दाखलयाप्रकरणी पलक्कड उत्तर पोलिसांनी कलम ३(अ), कलम ४(अ) आणि कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली जात असून शाळेच्या आवारात स्फोटके ठेवणाऱ्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चौकशी करण्याची मागणीभाजप जिल्हा नेत्यांनी या घटनेमागे मोठे कट असल्याचा आरोप केला आहे आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे. सीपीआय(एम) नेत्यांनी आरोप केला आहे की, शाळा व्यवस्थापन आरएसएसशी संबंधित आहे आणि परिसरात स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. काँग्रेसनेही या घटनेची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे.