एफटीआयआयचा अभ्यासक्रम विस्तारणार
By Admin | Updated: July 6, 2016 01:45 IST2016-07-06T01:45:23+5:302016-07-06T01:45:23+5:30
भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) वतीने चालविणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय संस्थेच्या कार्यकारी मंडळाने घेतला आहे.

एफटीआयआयचा अभ्यासक्रम विस्तारणार
मुंबई : भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) वतीने चालविणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय संस्थेच्या कार्यकारी मंडळाने घेतला आहे. मंडळाची १२९ वी बैठक मंगळवारी मुंबईत झाली. या बैठकीत नवीन अभ्यासक्रमाला आणि परीक्षा पद्धतीला मान्यता देण्यात आली. आता या अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शिक्षकांना जे शिकवायचे आहे, ते शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांना नेमके काय हवे आहे, ते शिकण्यावर भर देण्यात येणार आहे.
अभ्यासक्रमात कोणत्या विषयांचा आणि कशा पद्धतीने समावेश केला जावा यासाठी नामवंत चित्रपट-दूरचित्रवाणी निर्माते बी.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विस्तृत कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार एफटीआयआय भविष्यात वेगवेगळे २२ अभ्यासक्रम चालवणार आहे. दिग्दर्शन, अभिनय, संपादन आणि संकलन, ध्वनी संयोजन यासारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांबरोबरच संगीत संयोजन, अॅनिमेशन, रंगभूषा, वेशभूषा या विषयांचे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम एफटीआयआयमध्ये शिकवले जाणार आहेत. (प्रतिनिधी)