Exit Poll : मणिपूरमध्ये पहिल्यांदाच उमलणार कमळ
By Admin | Updated: March 9, 2017 20:50 IST2017-03-09T17:57:47+5:302017-03-09T20:50:34+5:30
पूर्वेतील सप्तभगिनी असलेल्या सात राज्यापैकी आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडनंतर आता मणिपूरमध्येही कमळ उमलण्याची शक्यता आहे

Exit Poll : मणिपूरमध्ये पहिल्यांदाच उमलणार कमळ
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - पूर्वेतील सप्तभगिनी असलेल्या सात राज्यापैकी आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडनंतर आता मणिपूरमध्येही कमळ उमलण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांपैकी 25 ते 31 जागा भाजपाच्या खात्यात जाण्याचा अंदाज आज जाहीर झालेल्या टाइम्स नाऊ व्हीएमआयच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
मणिपूरमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या ओकाराम इबोबी सिंग यांच्या वर्चस्वाला धक्का लागण्याचे संकेत मिळत आहेत. आज आलेल्या टाइम्स नाऊ व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार मणिपूरमध्ये भाजपाला 25 ते 31, काँग्रेसला 17 ते 23 आणि इतर पक्ष व अपक्षांना 9 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तर सी-व्होटरनेही मणिपूरमध्ये भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली आहे. सी-व्होटरच्या अंदाजानुसार मणिपूरमध्ये भाजपा 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरेल. तर काँग्रेसला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर अन्य पक्षांना 12 पर्यंत जागा मिळू शकतात.
2012 साली झालेल्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला 42 जागांवर विजय मिळाला होता. तर तृणमूल काँग्रेसने 7 जागा जिंकल्या होत्या तर इतरांच्या खात्यात 11 जागा गेल्या होत्या. मात्र यावेळी सत्तेत येण्यासाठी प्रबळ दावेदार बनलेल्या भाजपाला त्यावेळी एकही जागा जिंकता आली नव्हती.