रांची : झारखंडच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शिबू सोरेन यांनी देशाच्या राजकारणाला एक नवीन आकार देणारा वारसा मागे सोडला आहे. सोरेन (८१) यांच्या निधनाने आदिवासी चळवळीला राष्ट्रीय मान्यता मिळालेल्या राजकीय युगाचा अंत झाला आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात आदिवासींच्या हक्कांसाठी कायम लढा दिला.
शिबू सोरेन हे फक्त १५ वर्षांचे असताना त्यांचे वडील शोबरन सोरेन यांची २७ नोव्हेंबर १९५७ रोजी जंगलात सावकारांनी हत्या केली होती. या घटनेचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला आणि भविष्यात आपण राजकारणात जायचे यासाठी त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली. जमीनदारी शोषणाविरुद्धच्या त्यांच्या तळागाळातील चळवळीला ते एक प्रमुख आदिवासी नेते बनले होते.
शिबू सोरेन हे काही वेळा दुमका मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. जून २०२० मध्ये त्यांची राज्यसभेसाठी निवड झाली होती.
तीन वेळा मुख्यमंत्रीशिबू सोरेन हे तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री झाले होते. १९७५ च्या चिरूडीह हत्याकांडात ११ जणांच्या हत्येचा प्रमुख आरोपी म्हणून त्यांच्यावर २००४ मध्ये अटक वॉरंट निघाले. न्यायालयीन कोठडीनंतर सप्टेंबर २००४ मध्ये त्यांना जामीन मिळाला आणि नोव्हेंबरमध्ये पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करण्यात आले. मार्च २००८ मध्ये त्यांना निर्दोष घोषित केले गेले.
शिबू सोरेन यांच्या निधनाने सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. - द्रौपदी मुर्मु , राष्ट्रपती.
सोरेन यांनी वंचितांच्या सक्षमीकरणासाठी खूप मोठे कार्य केले. त्यांनी या लोकांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. नरेंद्र मोदी, पंतप्रधान