पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यदलाला त्यांच्या हवाई तळांवर हल्ला चढवत अद्दल घडवली होती. जवळपास तीन ते चार दिवस चाललेल्या या संघर्षादरम्यान, भारताच्या सैन्यदलांचं श्रेष्ठत्व अधोरेखित झालं होतं. आता भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या दैदिप्यमान कारवाईमागील एकेक पैलू समोर येत आहे. त्यात हळदी घाटीमध्ये केलेला सराव, सीडीएस यांनी आखलेली रणनीती आणि तिन्ही दलांमधील उत्तम समन्वय यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले.
भारतील लष्कर आणि नौदलाने १८ ते २२ एप्रिलदरम्यान हल्दीघाटीमध्ये एक सराव केला होता. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सरावाचा उद्देश हा लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये तात्काळ आणि स्पष्टपणे संवाद व्हावा हा होता. याचदरम्यान, पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजून तिन्ही सैन्यदलांमध्ये आवश्यक व्यवस्था त्वरित प्रभावाने सक्रिय केली गेली पाहिजे हे समजून घेतले. त्याबरोबरच एअर डिफेन्स सिस्टिमही सीमावर्ती भागात तैनात करण्यात आली.
तिन्ही सैन्यदलांच्या कमांड कंट्रोल आणि रडार सिस्टिमला जोडून पाकिस्तानच्या सीमेवर पसरलेल्या संपूर्ण युद्धक्षेत्राचं चित्र एकाच ठिकाणाहून स्पष्टपणे दिसेल, एक असं नेटवर्क तयार करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं तेव्हा या सिस्टिमच्या मदतीने लष्कराकडून उमटणारी प्रतिक्रिया स्पष्टपणे दिसून आली. तसेच त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. सूत्रांनी सांगितले की, तिन्ही सैन्यांचे रडारही संरक्षण दलांच्या मुख्यालयांपर्यंत स्पष्ट फोटो पाठवत होते.तसेच त्यांना त्यानुसार निर्णय घेण्यास सक्षम बनवण्यात येत होते. दरम्यान, जमिनीवर तैनात तुकड्यांना भविष्यातील युद्धाच्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यामुळे ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यात यश मिळालं. सीडीएस जनरल चौहान हे दीर्घकाळापासून तिनी सैन्यदलांमध्ये ऐक्याला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या रणनीतीने भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षामध्ये उत्तम परिणाम समोर आणले होते. तिन्ही सैन्यदलांची ताकद, शस्त्र सामुग्री आणि विचारशक्ती एक झाली, त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई तत्काळ आणि प्रभावीपणे पूर्ण होऊ शकली.