An exchange of fire between terrorists and security forces is underway in forests of Tral | पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार
पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर - पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. अद्यापही या परिसरात चकमक सुरुच असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्रालच्या जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. 42 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांकडून त्राल परिसरात विशेष ऑपरेशन हाती घेण्यात आलं आहे. 

आज सकाळी त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबारी करण्यात आली. याआधीही पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रानापथरीच्या जंगलात जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं. पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरातही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली त्यानंतर या परिसरात कारवाईला सुरुवात केली. 


काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय लष्कराला मोठं यश प्राप्त झालं होतं. पुलवामा हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांमधील एक आणि जैश कमांडर सज्जाद भटला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं होतं. त्याचसोबत आणखी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आलं होतं.


 

अनंतनाग परिसरात केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला होता. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही या परिसरात शोधमोहीम सुरु आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सज्जाद भट लष्कराच्या निशाण्यावर होता. पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र सज्जादने रचलं होतं. भारतीय लष्कराने केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये जवानांनी दहशतवाद्यांच्या अनेक तळांना लक्ष्य केलं आहे. त्याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, दारुगोळा जप्त करण्यात आला. 


दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसीय जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते काश्मीरमधील सद्यपरिस्थिती आणि तेथील फुटिरतावाद्यांची भूमिका यासंदर्भात माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. विशेष म्हणजे तत्पूर्वीच देशापेक्षा कुणीही मोठं नसल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. शहांच्या दौऱ्यानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे.  


Web Title: An exchange of fire between terrorists and security forces is underway in forests of Tral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.