नवी दिल्ली : जगातील प्रत्येक १३ वा नवा कॅन्सर रुग्ण हा भारतीय असून जगातील एकूण प्रमाण पाहता भारतीय कॅन्सर रुग्णांचे प्रमाण ७.५ टक्के असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी लोकसभेत दिली.२०१२ मध्ये जगभरात १,४०,६७,८९४ कर्करोग रुग्णांची नोंद झाली असून त्यातील १०,५७,२०४ रुग्ण हे भारतातील आहेत. वृद्धांची मोठी संख्या, जीवनशैलीतील अनारोग्य, तंबाखू आणि तंबाखूयुक्त उत्पादनांचा वापर, निकृष्ट आहार आदी त्यामागील कारणे आहेत. जगातील एकूण रुग्णांमध्ये भारतीय रुग्णांचे प्रमाण ७.५ टक्के आहे याचा अर्थ जगातील प्रत्येक १३ वा नवा रुग्ण हा भारतीय आहे, असा होतो, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)राज्य सरकारकडून दिली जाणारी आरोग्यसेवा सुधारण्यासह कॅन्सर प्रतिबंध, निदान आणि उपचारासारख्या उपाययोजनांमध्ये केंद्राकडून मदत दिली जात आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत जिल्हास्तरावर राष्ट्रीय कार्यक्रम राबविले जात आहेत. कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात यासारख्या आजारांना प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्याचा त्यामागे उद्देश आहे. कॅन्सर प्रतिबंधांसाठी जनजागृती, तपासणी, लवकर निदान, उपचारासाठी योग्य संस्थांमध्ये पाठविणे यासारखे कार्यक्रमही राबविले जात असल्याचे नड्डा यांनी सांगितले.
जगातील प्रत्येक १३ वा नवा कॅन्सर रुग्ण हा भारतीय
By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST