महिलेच्या चारित्र्याची ढाल करत निर्दोष सुटलेल्या एका आरोपीला अलाहाबाद हायकोर्टाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. भलेही ही महिला सेक्स अॅडिक्ट का असेना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जाऊ शकत नाही, असे कोर्टाने सुनावले आहे.
सत्र न्यायालयाने पुरावे समजून घेण्यात चूक केली आणि बलात्काराच्या आरोपीला निर्दोष सोडले होते. याविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपिल केले होते. न्यायालयाने इटावा सत्र न्यायालयाच्या निर्दोष सुटकेच्या आदेशाविरुद्ध अपिल मंजूर करत आरोपीला सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी सहा वर्षे ९ महिने ११ दिवस तुरुंगात होता. सत्र न्यायालयाने त्याला सोडल्याने तो बाहेर आला होता. आता त्याला पुन्हा सरेंडर होण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती सौमित्र दयाल सिंह आणि न्यायमूर्ती संदीप जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
प्रकरण काय होते...
पुष्पेंद्र उर्फ गब्बर असे या आरोपीचे नाव आहे. त्याने बंदुकीच्या धाकावर महिलेवर बलात्कार केला होता. ११ सप्टेंबर २०१६ रोजी पीडित महिला तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत व भावासोबत घरी होती. आरोपी बंदूक घेऊन घरात घुसला आणि त्याने तिचा होणारा नवरा आणि भावाला कपडे काढायला भाग पाडले. त्यांचा व्हिडीओ बनवून या दोघांना घराबाहेर हाकलले, व तिच्यावर बलात्कार केला. तसेच जर ती त्याच्यासोबत गेली नाही तर तो तिला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देईल, अशी धमकी दिली होती. यामुळे महिला त्याच्यासोबत गेली होती. घरी परतल्यावर तिने आपल्यासोबत काय घडले याची माहिती दिली.
सत्र न्यायालयात ही महिला सेक्स अॅडिक्ट होती असा युक्तीवाद करण्यात आला होता. तसेच या दोघांच्या कुटुंबात पूर्वीपासूनच वैर होते आणि एफआयआर उशिरा दाखल करण्यात आला, असा युक्तीवाद करण्यात आला होता. तसेच वैद्यकीय अहवाल देखील घटनेच्या बाजुने नव्हता. यावर सत्र न्यायालयाने आरोपीला आरोपमुक्त केले होते.