संक्रांत सुरु झाल्यापासून चायनिज मांजा पुन्हा चर्चेत आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पीएसआयचा गळा कापला आहे, हा अधिकारी वाचला असला तरी तिकडे नाशिकमध्ये एका तरुणाला मांजाने गळा चिरल्याने प्राण गमवावा लागला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून एकेक करून बातम्या येत आहेत. या मांज्याच्या दहशतीत एका दुकानदाराने एवघ्या १५० रुपयांत मांजापासून वाचण्यासाठी तगडा जुगाड शोधला आहे.
देशभरात नायलॉन मांजाने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील दुकानदाराने एक लोखंडाचा रॉड वाकवून तो हँडलला असा लावला आहे की त्यामुळे त्याला मांजा अडकला तर तो गळ्यापर्यंत किंवा शरीरापर्यंत येणार नाही. पर्यायाने गळा कापण्यापासून किंवा दुखापतीपासून वाचता येणार आहे.
दुकानदाराचा हा जुगाड पाहून आता लोक त्याला असाच गार्ड बनवून देण्यासाठी ऑर्डर देऊ लागले आहेत. लोखंडी रॉड तारेसारखाच लवचिक आहे. यामुळे तो हव्या त्या स्कूटर, बाईकवर हवा तसा वाकविता येतो. या दुकानदाराने आधी तो आपल्या बाईकवर लावला आहे. याची त्यांनी टेस्टिंगही केली आहे.
हा मांजा त्यांनी अशा आकारात वाकडा बसविला आहे, ज्यावर मांजा आला की तो सरकून मागे जातो व दुचाकीस्वार आरामात पुढे जातो. यासाठी त्याने वाटेत मांजा आडवा ठेवून विषाची परीक्षा घेतली होती. यानंतर त्याने यावर काम करण्यास सुरुवात केली आणि अखेर याचे अभ्यासपूर्ण मॉडेल बनविले जे पूर्णपणे दुचाकीस्वाराला सुरक्षित ठेवू शकते.
या दुकानदाराने या मांजा गार्डची किंमत १५० रुपये ठेवली आहे. ज्यांच्याकडे तो खरेदी करण्याचे पैसे नाहीत त्यांना तो हा गार्ड मोफत देत आहे. लोकांचा जीव वाचावा ही यामागची भावना असल्याचे त्या दुकानदाराचे म्हणणे आहे.