शहरातील आधुनिक आणि गतिमान जीवनाचं आकर्षण सर्वांनाच असतं. येथील टोलेजंग इमारती, आलिशान वाहने, सतत कुठे ना कुठे न कुठे धावपळ करत असलेले लोक यामुळे येथील जीवन खूप सुंदर असेल असं लोकांना वाटतं. चांगली नोकरी, इमारतीत घर आणि शहरात राहण्याचा अभिमान हे सारं काही स्वप्नवत वाटतं. त्यामधून शहराकडे धाव घेणारे हजारो लोक अशा जीवनाची स्वप्न पाहत असतात. मात्र प्रत्यक्षात वास्तव काही वेगळंच आहे. हेच वास्तव एका व्यक्तीने सोशल मीडियावरून मांडलं आहे. तसेच त्याने मांडलेली ही व्यथा EMI च्या ओझ्याखाली दबलेल्या प्रत्येक मध्यमवर्गीयाला आपली व्यथा वाटू शकते.
या पोस्टमध्ये प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबून कसं जीवन जगतो. भारातातील तरुण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ईएमआयच्या जाळ्यात कशी फसतात, तसेच त्यामधून बाहेर पडणं कसं अशक्य होऊन जातं याची मांडणी केली आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सोसायटीमधील स्विमिंग पूलाजवळ उभा राहिलेला दिसत आहे. त्या तरुणाच्या मागे गगनचुंबी इमारती दिसत आहेत. ‘मी कधी कधी हे पूल पाहायला येतो. कारण पोहण्यासाठी माझ्याकडे एका मिनिटाचाही वेळ नाही, असे तो शांत आवाजात सांगताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो पुढे सांगतो की, येथे राहणारे बहुतांश लोक ईएमआय भरत आहेत. तसेच सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चमचमत्या गाड्यासुद्धा लोनवरच घेतलेल्या आहेत.
डोक्यावर ईएमआयचं ओझं असल्याने लोक नोकरी सोडण्याची हिंमत करू शकत नाहीत. काम आवडो अगर न आवडो, दर महिन्याला बँकेला ६०-७० हजार रुपये देण्याची भीती माणसाला नोकरी करण्यास भाग पाडत आहे. मग ऑफीसमध्ये जीव गेला तरी हरकत नाही, पण लोक नोकरी सोडणार नाही, असे तो हताशपणे सांगतो.
सोसायटीमध्ये असलेल्या जिम आणि पुलासारख्या सुविधांचा वापर ज्यांच्यावर कुठलंही आर्थिक ओझं नाही, असेच लोक करत आहेत. तर ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे लोक केवळ ईएमआय भरण्याच्या गुंत्यात अडकलेले आहेत, असेही त्याने सांगितले.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तसेच त्यावर चर्चाही सुरू झाली आहे. या जगात सर्वात श्रीमंत तोच ज्याच्यावर कुठलंही कर्ज नाही आहे, असं महाभारतात म्हटलेलं आहे, अशी प्रतिक्रिया एका युझरनं दिली आहे.
शेवटी हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या तरुणानं सांगितलं की, ही कहाणी केवळ दिल्ली-एनसीआरची नाही तर बंगळुरू आणि इतर मोठ्या शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे. भारतामध्ये व्यवस्थाच अशी तयार करण्यात आली आहे की, ज्यामध्ये मध्यमवर्ग नेहमीच ईएमआयच्या जाळ्यात अडकून राहतो, अशी टीकाही त्याने केली.