संपत्ती हडपण्यासाठी टोळक्याचा व्यवस्थापकासह कर्मचार्यांवर हल्ला
By Admin | Updated: July 9, 2015 00:59 IST2015-07-08T23:45:05+5:302015-07-09T00:59:28+5:30
देवळाली कॅम्प येथील घटना : दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल

संपत्ती हडपण्यासाठी टोळक्याचा व्यवस्थापकासह कर्मचार्यांवर हल्ला
देवळाली कॅम्प येथील घटना : दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल
नाशिक : देवळाली कॅम्पमधील फरजंदी बागेतील बंगला हडपण्यासाठी तेथील व्यवस्थापकासह कर्मचार्यांवर एका सशस्त्र टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे़ विशेष म्हणजे या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी यातील संशयितांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही़ दरम्यान या घटनेमुळे तेथील कर्मचारी भयभीत झाले असून या बंगल्याच्या विदेशास्थित मालकाने तातडीने देशात धाव घेतली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली कॅम्पच्या रेस्ट कॅम्प भागातील फरजंदी बागचे मालक परवीन जहांगीर फरजंदी हे असून त्यांचे २४ एप्रिल २०१५ ला निधन झाले़ त्यांनी आपली संपत्ती मृत्युपत्राद्वारे बहीण बानू सॅमसन यांचा मुलगा हनोश मुकादम यांच्या नावावर केली असून सध्या ते अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये वास्तव्यास आहेत़ गत चार वर्षांपासून या मिळकतीची देखभाल लोगनाथन थिरूबलाम हे पाहत असून काही दिवसांपूर्वी संशयित पुष्पा नवले व शहाजी माने हे मिळकतीच्या चौकशीसाठी आले़ त्यांना मूळमालक विदेशात असल्याचे सांगितल्यानंतर ते निघून गेले़
यानंतर ५ जुलैला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास व्यवस्थापक थिरूबलाम आराम करीत असताना संशयित पुष्पा नवले, आदित्य माने हे दोन महिला व सात-आठ इसमांनी बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला़ त्यांनी हातातील हत्यारांनी तोडफोड करून घरातील सर्वांना मारहाण करीत डांबून ठेवले तसेच बाहेर उभ्या असलेल्या मारुती वाहनाची तोडफोड केली़ यानंतर घरातील कर्मचार्यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिक जमा झाल्याने हे टोळके फरार झाले़
याप्रकरणी शकुंतला मगर या मजूर महिलेने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी केवळ अदखलपात्र नोंद करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली़ दरम्यान घटनेच्या दोन दिवसानंतर पोलिसांनी हा गुन्हा केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जाते आहे़ (प्रतिनिधी)