24 वर्षांखालील तरुणांचा बचतीवर भर; क्रिप्टोकरन्सीवर विश्वास नाही, सर्वेक्षणातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 09:58 AM2021-11-12T09:58:25+5:302021-11-12T10:00:02+5:30

‘व्हायरल फिशन’ नामक एका ‘यूथ कम्युनिटी प्लॅटफॉर्म’ने  केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

Emphasis on savings for youth under 24 years | 24 वर्षांखालील तरुणांचा बचतीवर भर; क्रिप्टोकरन्सीवर विश्वास नाही, सर्वेक्षणातील निष्कर्ष

24 वर्षांखालील तरुणांचा बचतीवर भर; क्रिप्टोकरन्सीवर विश्वास नाही, सर्वेक्षणातील निष्कर्ष

Next

नवी दिल्ली : भारतातील ‘जनरेशन झेड’मध्ये म्हणजेच १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्माला आलेल्या मुलांत बचतीचा कल वाढताना दिसून येत आहे. २४ वर्षांच्या आतील या तरुणांना वयाची ४० वर्षे पूर्ण व्हायच्या आत पुरेशी बचत करून ठेवायची आहे. विशेष म्हणजे, ही पिढी बचतीसाठी पारंपरिक साधनांना प्राधान्य देत असून, त्यांचा क्रिप्टोकरन्सीवर विश्वास नसल्याचे दिसून आले आहे.

‘व्हायरल फिशन’ नामक एका ‘यूथ कम्युनिटी प्लॅटफॉर्म’ने  केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार, ३२ टक्के जनरेशन झेड पैसे खर्च करण्यापेक्षा बचत करण्यास प्राधान्य देत आहे. व्याजदर घसरलेले असताना २३ टक्के तरुणांनी मुदत ठेवीत पैसे गुंतविण्याच्या बाजूने कौल दिला आहे.

क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतवू इच्छिणाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. तरूण पिढी हि बदलत असून, बचतीकडे त्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.  ‘व्हायरल फिशन’चे मुख्य महसूल अधिकारी आदित्य आनंद यांनी सांगितले की, कोरोना साथीनंतर नवी पिढी खर्चाबाबत अधिक सतर्क और जबाबदार झाली आहे.

तंदुरुस्ती व मनोरंजनास सर्वांत कमी महत्त्व

‘जनरेशन झेड’कडून सब्सक्रिप्शन, तंदुरुस्ती व मनोरंजनास सर्वांत कमी महत्त्व दिले जात आहे. अनेकांनी तर यावर अजिबात खर्च करणार नसल्याचे सांगितले. १३ टक्के तरुणांना शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे आहेत. जवळपास २५ टक्के तरुण फिरण्यावर, तर १३ टक्के तरुण शॉपिंगवर खर्च करू इच्छितात.

असा आहे तरुणांतील कल
‘जनरेशन झेड’मध्ये दिसून आलेला खर्चविषयक कल पुढीलप्रमाणे आहे 
बचत     -     ३२%
प्रवास     -    २४%
गुंतवणूक     -    १३%
वाणसामान     -    १३%
खाद्य व खरेदी     -    १३%
तंदुरुस्ती व मनोरंजन     -    ०५%
स्रोत : ‘व्हायरल फिशन’चा यूथ कम्युनिटी प्लेटफॉर्म

Web Title: Emphasis on savings for youth under 24 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत