हाथी चले बिहार..... भौंके हजार - शत्रुघ्न सिन्हांचा भाजपावर पलटवार
By Admin | Updated: November 10, 2015 12:34 IST2015-11-10T10:20:24+5:302015-11-10T12:34:43+5:30
भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची कुत्र्याशी तुलना करणारे भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले.

हाथी चले बिहार..... भौंके हजार - शत्रुघ्न सिन्हांचा भाजपावर पलटवार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची कुत्र्याशी तुलना करणारे भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले. हाथी चले बिहार, कुत्ते भौके हजार (हत्ती निघाले बिहारला, कुत्रे भूंकतील हजार) असे सडेतोड प्रत्युत्तर शत्रुघ्न सिन्हा यांनी दिले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. निवडणुकीचा निकाल लागल्यावरही शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांची भेट घेत त्यांचे जाहीर कौतुक केले होते. यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयवर्गीय यांनी शत्रुघ्न सिन्हा यांची कुत्र्याशी तुलना करुन नवीन वादाला तोंड फोडले होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर या वादावर भाष्य केले. 'सध्या अनेकजण मला प्रतिक्रिया विचारत आहे, कोणत्याही छोट्या किंवा मोठ्या पक्षाला मी एकच सांगीन, हत्ती निघाले बिहारला, ...भौंके हजार' असे सूचक विधान करत त्यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी कुत्रा या शब्दाचा थेट उल्लेख करणे टाळले आहे.
जेव्हा एखादी बैलगाडी चालते, तेव्हा तिच्याखालून कुत्रा चालत असतो. परंतु ही बैलगाडी माझ्याच बळावर चालत असल्याचे कुत्र्याला वाटत असते. भाजपा कुणा एका व्यक्तीच्या जीवावर चालत नाही. पक्ष संपूर्ण संघटन आहे, जे पक्षच्या बाहेर आहेत ते मौन धारण करुन होते व आता ते बोलत आहेत अशी वादग्रस्त प्रतिक्रिया विजयवर्गीय यांनी दिली होते.