हिंसाचाराविना झालेली निवडणूक
By Admin | Updated: November 9, 2015 00:36 IST2015-11-09T00:36:36+5:302015-11-09T00:36:36+5:30
बिहारमधील निवडणूक आणि हिंसाचार हे एक समीकरणच बनले आहे. गेल्या काही निवडणुकांचा विचार केल्यास २०१५ ची विधानसभा निवडणूक याला अपवाद ठरते.

हिंसाचाराविना झालेली निवडणूक
पाटणा : बिहारमधील निवडणूक आणि हिंसाचार हे एक समीकरणच बनले आहे. गेल्या काही निवडणुकांचा विचार केल्यास २०१५ ची विधानसभा निवडणूक याला अपवाद ठरते. काही किरकोळ अपवाद वगळता पाच टप्प्यांतील मतदान शांततेत पार पडले. याचे श्रेय निवडणूक आयोग आणि राज्य प्रशासनाला दिले पाहिजे.
बिहारमधील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. निवडणूक आणि त्याला विरोध करणारे नक्षलवादी ही येथील मुख्य समस्या आहे. २४३ विधानसभा मतदारसंघांपैकी ३७ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात, तसेच बिहारचे राजकारण अत्यंत टोकाची पातळी गाठत असल्याने पक्षीय वाददेखील हिंसेला कारणीभूत ठरतात. त्यामुळे येथे शांततेत निवडणूक घेणे एक दिव्यच ठरते. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी राज्य पोलीस आणि निमलष्करी दलाच्या ९९३ कंपन्या तैनात केल्या होत्या. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलाची पाच हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत.