Election Commission on Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत भाजप व निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत काही पुरावे सादर केले आहेत. देशभरात निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून हा लोकशाहीवर हल्ला आहे. भाजप व निवडणूक आयोग बनावट मतदार तयार करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगानेही आता प्रत्युत्तर दिलं आहे. प्रतिज्ञापत्रावर सही करा किंवा देशाची माफी मागा असे दोन पर्याय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना दिले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी प्रेझेंटेशन देत निवडणूक आयोगावर मतदार यादीत घोटाळा केल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी कर्नाटकात एक लाख मते चोरीला गेल्याचे म्हटले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना एक शपथपत्र पाठवून ते जे काही बोलत आहेत ते बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. जर ते चुकीचे आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगाने म्हटलं. मात्र या शपथपत्राबाबत राहुल गांधी किंवा काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा राहुल गांधींना कागदावर स्वाक्षरी करण्याचे किंवा देशाची माफी मागण्याचे पर्याय दिले आहेत.
जर राहुल गांधींना वाटत असेल की त्यांचे विश्लेषण बरोबर आहे आणि आमच्यावर केलेले आरोप बरोबर आहेत, तर त्यांना ते शपथपत्रात समाविष्ट करण्यास काहीच हरकत नसावी. जर राहुल गांधी कागदावर स्वाक्षरी करत नसतील तर याचा अर्थ असा की त्यांना स्वतःच्या शब्दांवर विश्वास नाही. त्यांना वाटत नसेल की त्यांचे विश्लेषण बरोबर आहे. यावरून त्यांचे दावे खोटे आहेत हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत, त्यांनी खोटे आरोप केल्याबद्दल आणि निवडणूक व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी केल्याबद्दल देशाची माफी मागावी, असं निवडणूक आयोगाने म्हटलं.
निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दोन पर्याय दिले आहेत, एकतर त्यांनी कागदपत्रावर सही करावी किंवा देशाची माफी मागावी. मात्र राहुल गांधी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेनंतर या प्रकरणाबाबत काँग्रेस बंगळुरूमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी पुन्हा निवडणूक आयोगावर आरोप केले आणि वेळ बदलल्यावर शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला.